Wednesday 13 April 2016

Ki & Ka

कि आणि का : सिनेमातले आणि वास्तवातले
कि आणि का सिनेमा गाजतोय. का तर त्याच्यात पती गृहिणीची(क्षमस्व होम-मेकरची) भूमिका करतो. या सिनेमाला आपण दोघं जायलाच हवं अशा होम-मेकर महिलांना नक्कीच वाटत असणार! आणि ‘बघा बघा तो अर्जुन कपूर, नाहीतर ...तुम्ही’. अगदी असाच प्रश्न माझ्या मित्राच्या बायकोने विचारला. आता प्रश्न त्याच्या पुरूषी मानसिकतेचा होता. दोन मिनिटे थांबला आणि म्हणाला,’ तू करीना हो ,मी लगेच नोकरी सोडतो आणि घरचं सगळं मी बघतो.’
“ फ्रीजमध्ये दही सापडत नाही. चहा शिवाय काही -करता येत नाही की पांघरुणाच्या घड्या नित घालता येत नाहीत. आणि म्हणे अर्जुन कपूर होणार!” भांडण पुढे जाण्या अगोदर त्याने काढता पाय घेतला.
वर्षानुवर्ष आपल्या मुलांवर “ तो मुलगा आहे नां- त्याची करिअर महत्त्वाची” हे बिम्बवलेलं असतं. त्यामुळे अनेक मुलांना घरकाम, बाजारहाट, स्वयंपाक, अशा गोष्टींबद्दल गाढ अज्ञान असतं. आई त्याला अशी कामंच सांगत नाही. त्याला हे येणार तरी कसं? या उलट ब-याच घरात आया मुलींना होम-मेकरचं काम शिकवतच नाहीत. ‘एकदा लग्न झालं तर आयुष्यभर करायचीच आहेत ही कामं. लेक शिकतीय करिअर करतीय करू द्यावे ना तिला! घरची कामं तर पाचवीलाच पुजली आहेत बायकांच्या”
या परिस्थितीत जी मुलं किंवा मुली वाढवल्या गेल्या आहेत त्यांचा लग्नानंतर अनेक अवघड प्रसंगांना सामोरं जावं लागतं. या प्रश्नावर मात करण्यासाठी पुण्यात पुरुषांसाठी स्वयंपाकाचे क्लासेस सुद्धा सुरू झाले आहेत. नव विवाहित म्हणतात, “ स्वयंपाकाला बाई, केर-फरशी-धुणं भांडी हे तर घरकाम करणा-या बायकाच करतात. आणि समजा तिने दांडी मारलीच तर जागोजागी होटेल्स काही कमी आहेत का?
अलीकडची मुले पत्नीला कामात आवर्जून मदत करतात. दोघंही नोकरी करणारे असल्यामुळे कामं वाटून घेऊ लागली आहेत. जयदीप आणि ऋता यांच्यामध्ये तर चक्क करार झालं आहे. त्या कराराप्रमाणे –जयदीप सकाळचा चहा आणि ब्रेकफास्ट करतो. दुपारचे जेवण ऑफिसमध्ये होते. पण बरोबर मूग, सॅलड़ , दही ते ताक कपडे धुणे -मशीन मध्ये हे ऋता करते. रात्रीचे जेवण तीन दिवस ऋता आणि दोन दिवस जयदीप बनवतो. दोन दिस डिनर बाहेर. अशी सोय करणारे अनेक जयदीप-ऋता आहेत.

काही वर्षापूर्वी ज्यांची लग्ने सेवा दलात झाली आहेत तिथे आर्थिक कर्ता बायको असायची आणि आंदोलने वगैरे काही नसेल तेंव्हा ही मंडळी होममेकर बनायची. आणि त्याचे त्यांना अप्रूप वाटायचं नाही. अनेक घरात पुरुष घरातील महत्त्वाची कामे पुरुष करत असत. परंतु मनी मॅनेजमेंट मात्र त्यांच्याच ताब्यात असे.
आमच्या घराच्या आसपास अनेक टुमदार घराच्या सोसायट्या आहेत. त्या पैकी अनेकांची मुले परदेशी आहेत किंवा दुस-या गावी वगैरे राहतात. जवळच भाजी बाजार आहे. सकाळी सात वाजता तिथे पुरुषांची गर्दी असते. सगळी रिटायरड मंडळी. सकाळी फिरायला जातात. भाजी बाजाराजवळ एक चहाची टपरी आहे, तिथे चहा-धूम्रपान झाले कि भाजी बाजार. कि थेट घरी.
एकदा केवळ उत्सुकतेपोटी बँकेतून रिटायर झालेले कुलकर्णी मला भाजी बाजारात भेटले. मी म्हणालो,’ चहा घेऊ या?’ ते म्हणाले,’चहाच काय मस्त पैकी शिरा खाऊ. डायबेटीस आहे ना- घरी करत नाहीत आणि ती बरोबर असली तर मला शिराच काय आंबा सुद्धा खाऊन देत नाही. आणि थोड्या गप्पा मारू.” चालत चालत आम्ही एका छोट्याशा हॉतटेलात शिरलो.
“ तर तुला सांगत होतो की रिटायर मेंट मी अगदी मजेत घालवतोय. अजून तिची नोकरी चार वर्ष तरी आहे. काय आहे पूर्वी लग्नात पाच सहा वर्षांचे अंतर असायचे. बरं एकच मुलगा आम्हाला. त्यामुळे घरात दोघंच रे. ही दिवसभर कामाला जाते. मी एकटा. मी बायकोला म्हणालो व्हीआरेस घे. पण ती म्हणते पुढे राहायचेच आहे दोघांना. जरा मला चेंज होतो.. मग मी विचार केला इतकी वर्ष तिने नोकरी सांभाळून घर चालवलं. माझ्या बदल्या दर दोन तीन वर्षांनी व्हायच्या. मुलाच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून इथेच रहायची. आता माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला आता दिवसभर काय करायचं?’.” ‘साहजिक आहे. आणि निवृत्तिच्या वयात माणसं ब-यापैकी फीट असतात.’
‘येस. माझा डायबेटीस सोडला तरी दुसरा कोणताही आजार नाही. आणि तो सुद्धा अगदी कंट्रोल मध्ये आहे.’ पायनापल शी-याचा घास घेत त्यांनी एक पॉज घेतला.” मला काही सहकारी बँकेत सल्लागार या म्हणून बोलवत होते. पण मी ठरवलं पुन्हा बँकेची झंझटच नको.
मी विचार केला, आत्ता पर्यंत जे काही आपण केलं नाही ते करायचं. सगळे पर्याय बघितलं तेंव्हा लक्षात आलं आपण कधीही घरातली कामं केली नाहीत. त्यामुळे आता होम मिनिस्टर हेच करून बघावं. ते आयुष्यात मी कधी न केलेली गोष्ट होती. एक दिवस बायकोला सांगून टाकलं, या पुढे घर चालवणं ही माझी जबाबदारी.
आणि हळूहळू लक्षात यायला लागलं कि वाटते तितकी ही सोपी गोष्ट नाही. त्याची सुरुवात घरात काम करणा-या बायकांना मॅनेज करणे इथ पासून झाली. अरे मी दोन दोनशे स्टाफ असलेल्या रिजनल ऑफिस चालवणारा माणूस पण कामवाल्या बायांना मॅनेज करणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. तिथपासून माझी परीक्षा सुरू झाली. स्वयंपाकाचा अंदाज यायचा नाही. मग पदार्थ शिल्लक रहायचे! मोलकरणीची धन. एक दिवस निर्णय घेतला कि बास तिन्ही बायकांना रिटायर करायचं. घरी डी वॉशर घेतला , व्हॉक्युम क्लीनर घेतला  आणि पोळ्या सोडून सगळी कामे सुरू केली. अरे गेल्या काही महिन्यात पंजाबी पदार्थ, चायनीज पदार्थ, बिस्किटे आणि केक सगळे क्लासेस केले. आता मी दिवसभर घरी असतो तरी एक मिनिट कंटाळा येत नाही.”
कुलकर्णींची गोष्ट ऐकून मला छान वाटलं. मला यांच्या मनात खोलवर असलेली बायको बद्दलची कृतज्ञता जाणवली. होममेकर होणे हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. हा सुखद धक्का होता. बायकोसाठी एक प्लेट इडली चटणी घेतली आणि म्हणाले, ‘डबा करायचा आहे. घरी ये. तू सांगशील तो पदार्थ करून खायला घालतो. फक्त रविवार सोडून. तो दिवस सुट्टीचा. आमच्या दोघांसाठी राखीव.”
या वयात कदाचित अनेक पर्यायांपैकी तो असेल एक. पण नक्कीच ती अपरिहार्य परिस्थितीतून केलेली गोष्ट नव्हती आणि होममेकर होणे हा चॅलेंज म्हणून त्यांनी स्वीकारला होता.
पण माझ्या आसपास दोन पुरूष आहेत ज्यांनी आपणहून होममेकर म्हणूनच करिअर करायची असे ठरवले आणि गेली जवळजवळ अठरा एकोणिस वर्षे ती जबाबदारी निभावत आहेत.
चैतन्य माझा जुना मित्र. लग्न झालं तेंव्हा त्याला चांगली नोकरी होती. त्याची बायको एका नामवंत एमएनसी मध्ये एच आर विभागात चांगल्या पदावर नोकरीला होती. आणि दुर्दैव म्हणजे चैतन्याच्या कंपनीत कामगार प्रश्नांमुळे लॉकआउट झाला. त्याला जाणवले हे काही खरे नाही. त्याने काही दिवस प्रयत्न केले. पण नोकरी मनासारखी मिळत नव्हती. त्याची एकुलती एक तीन वर्षांची पाळणाघरात रहायची. स्वयंपाक, कपडे धुणे केर फरशी या सगळ्यासाठी  माणसं कामाला होती. त्याचा पगार येत नाही त्यात घर कर्जाचे हप्ते -पैशाची चणचण जाणवू लागली.
त्याच्या मनात हेच की मी काही कमवू शकत नाही आणि बाकीचे सर्व खर्च आहेत तसे आहेत. एक दिवस सहज मनात विचार आला -भले आपण पैसे मिळवत नसू. पण काही खर्च आपण वाचवू तर शकतो. त्याला त्याच्या सिनिअर कलीगने सांगितलेलं वाक्य आठवले.” If revenue is less no problem. Let us control our outflow”. उत्पन्न कमी होत आहे, हरकत नाही, आपण खर्चावर नियंत्रण तर आणू शकतो. हे वाक्य त्याच्या मनात रुंजी घालत होते. त्याने मनातल्या मनात यादी केली -कोणते खर्च आपण वाचवू शकू? त्याने यादी केली -पाळणाघर हा सर्वात मोठा खर्च होता. मुलीला प्ले ग्रुपला आणा पोचवायची रिक्षा, कपडे-भांडी, केर फरशी करणा-यांचे पगार, स्कूटरचा खर्च हे सगळे खर्च त्याच्या वाचवू शकणा-या यादीत होत्या.
आणि एक दिवस त्याने जाहीर केलं,” या सगळ्या जबाबदा-या मी सांभाळतो. बरेच खर्च वाचतील. आणि माझ्याकडे काय वेळच वेळ आहे.”. त्याची बायको चाटच पडली. तिने विचारलं” जमेल का हे सगळे करायला? तो म्हणाला,’ अजिबात काळजी करू नको या पुढे घरची जबाबदारी माझी. आणि पहिलं त्याने पाळणाघर बंद केले. मुलीची अंघोळ, तिच्या गणवेशाला इस्त्री करणे, तिची वेणी घालणे, शाळेत नेणे आणणे तेही सायकलवर अशा कामाने सुरुवात केली. हळू हळू केर-फरशी आणि घराची साफसफाई ही कामे सुरू केली. खरे म्हणजे त्याच्याकडे वॉशिंग मशीन होते. पण विजेची बचत म्हणून ते वापरणे बंद केले. वाणी सामान, सर्वात स्वस्त तरीही चांगले मिळेल याची खात्री करून घेऊ लागला. म्हणता म्हणता मुलगी मोठी झाली. तिच्या आईची पर गावी प्रमोशनवर बदली झाली. घरात बाप लेक अवघी दोन माणसे. त्याच कालावधीत मुलीची दहावी बारावी झाली. आता गेली काही वर्ष तो एक अर्धवेळ नोकरी करतो. पण सुरुवातीपासूनची कामे आहेत तशी चालू आहेत. बायकोच्या पगारात प्रचंड वाढ झाली आहे. पण अजून कामावर माणसे ठेवायला तो तयार नाही. एक दिवस विचारलं आता नोकरी का करत आहेस? तो म्हणाला, मुलीच्या लग्नाच्या खर्चात माझा काही आर्थिक सहभाग हवं ना!
हे वास्तव आहे. पण ते शहरातल्या विवेकी समाजाच्या पुरते मर्यादित आहे. सिनेमातला आशय चांगला आहे, महिलांच्या मनात स्वप्न दाखवणारा आहे. पण असं काही , म्हणजे भूमिका बदल हा पचणारा नाही. अनेक घरे सुविद्य आहेत पण महिलेला तिची परंपरेने लादलेली भूमिका निभावावीच लागते. मध्ये एका मोठ्या उद्योगात काम करणा-या सी.ई.ओ. महिलेची मुलाखत वाचनात आली. त्यांचे एक वाक्य माझ्या मनात पक्के बसले आहे. ते वाक्य असे होते” ऑफिस संपलं की आपल्या पदाचा आपल्या समाजातील स्थानाचा मुकुट उतरवायचा आणि घरचा उंबरठा ओलांडला की होममेकरच्या भूमिकेत शिरायचं!”
मला वाटतं या वस्तुस्थितीत बदल व्हावा असा वाटत असेल तर तू-तू करण्यापेक्षा संसार हा न्याय्य आणि प्रत्येक जोडीदाराच्या क्षमता आणि मर्यादा यांचे भान ठेवत श्रम विभागणी साठी मोठ्या स्तरावर जागृती होणे अनिवार्य आहे.